Thursday, April 10, 2014

निबंध

माझा आवडता पक्षी :
कोंबडी:
मला सगळेच प्राणी आवडतात.प्राणी खूप चविष्ट लागतात.कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझा आवडता पक्षी आहे...
कोंबडीपासून वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला ते बनवता येत नाहीत, पण खाता येतात.
कोंबडीला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पण ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेता खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो. याच तापाला "बर्ड फ्य्लू" का असेच काहीतरी इंग्रजी नाव आहे. मला गणित व इंग्रजी येत नसल्याने मला शाळेत खूप ताप यायचा.
कोंबडीला दगड मारल्यावर ती 'पकाक' असा आवाज काढते. मला तो खूप आवडतो. नाना पाटेकरचा 'पक् पक् पकाक्' असा सिनेमा आहे. भरत जाधवचा पण 'जत्रा' नावाचा कोंबडीवर सिनेमा आहे. तो मात्र अतिशय वाईट होता. सिनेमा बघणे वाईट असते, असे मोठी माणसे सांगतात पण मला सिनेमा पाहणे आवडते.
पुर्वीचे लोक कोंबड्या चोरत त्यांना 'कोंबडीचोर' म्हणत. चोरी करणे चूक आहे. चोरी केल्यावर आजकाल जेलमध्ये टाकतात. पुर्वी जेलमध्ये जाणे वाईट मानत व लोक त्यांचा तिरस्कार करत, पण आज जेलमध्ये जाणार्‍याला लोक संजय दत्त म्हणतात किंवा नेता म्हणून निवडून देऊन "लोकसभा" नावाच्या ठिकाणी पाठवतात. तिथे गेल्याने माणूस खूप श्रीमंत होतो असे माझे बाबा सांगायचे...
कोंबडीचे अंडे बहूपयोगी आहे. "आओ सिखाऊ तुम्हे अण्डे का फण्डा" या गाण्यात त्याचे वर्णन आहे. त्या गाण्यात मोनिका बेदी आहे. तिला जेलमध्ये अंडी देत होते.
अंडे संडे वा मंडेला खाल्ले पाहीजे. मंडेला काही लोकांचा उपास असतो. नेल्सन मंडेला उपास करायचे का हे मला माहित नाही. असो....
कोंबडीचा बळी देतात. बळी देणे वाईट प्रथा आहे, असे परवा गुरूजी कोंबडीवडे खाताना सांगत होते. गुरूजींना जाड भिंगांचा चष्मा लागला आहे. वाह्यात मुले त्यांना 'कोंबडी पकड!' असे म्हणतात. कोंबडीला पळत जाऊन पकडणे माणसाला हुशार बनवते.
म्हणूनच कुणाला तरी 'कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाया लागली' हे गाणं सूचलं. आणि माणसं हिरॉइनची तंगडी हाती लागत नाही, म्हणून कोंबडीच्याच तंगडीवर ताव मारत्यात. अन् पाव्हण्याला 'लेग पीस' वाढायची पध्दत पडली...
पुर्वी पहाटे कोंबडा आरवायचा. कोंबडी झोपून राहायची, आजकाल पहाटे 'दोघेही' झोपलेली असतात, म्हणून मोबाईलच आरवतो...




No comments:

Post a Comment