Sunday, July 28, 2013

दारूची कविता

मी संध्याकाळी घरी येतो,
तेव्हा बायको स्वयंपाक करत असते, 
शेल्फमधील भांड्यांचा आवाज येत असतो..
मी चोर पावलाने घरात येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
महाराज फोटोतून बघत असतात,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही..II१II

वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरून मी ग्लास काढतो,
चटकन एक पेग भरून आस्वाद घेतो,
ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो,
महाराज मंद हसत असतात,
स्वैपाकघरात डोकावून बघतो,
बायको कणीकच मळत असते..
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी रिस्क घेत नाही..II२II

मी: जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं..??
ती: छे! दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ!
मी परत बाहेर येतो,
काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो,
बाटली मात्र मी हळूच काढतो,
वापरात नसलेल्या फळीच्या मोरीवरून ग्लास काढतो,
पटकन पेगचा आस्वाद घेतो,
बाटली धुवून मोरीत ठेवतो,
काळा ग्लास पण कपाटात ठेवतो,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही..II३II

मी: अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं नाही..
ती: नाही काय? चांगली अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये..
मी:(आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा...
मी पुन्हा काळ्या कपाटातून कणिक काढतो,
मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते,
फळीवरून बाटली काढून मी पटकन मोरीत एक पेग मारतो,
महाराज मोठ्याने हसत असतात..
फळी कणकेवर ठेवून महाराजांचा फोटो धुवून मी काळ्या
कपाटात ठेवतो,
बायको ग्यासवर मोरीच ठेवत असते,
या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही.
कारण मी कधीच रिस्क घेत नाही..II४II

मी: (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस..??
पुन्हा बोललीस तर जीभच कापून टाकीन तुझी..
ती: उगीच कटकट करू नका..बाहेर जाऊन गप पडा..
मी कणकेतून बाटली काढतो,
काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो,
मोरी धुवून फळीवर ठेवतो,
बायको माझ्याकडे बघत हसत असते,
महाराजांचा स्वैपाक चालू असतो,
पण या जाधवांचा त्या जाधवांना पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही.. II६II

मी: (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं म्हणे..
ती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा..
मी परत स्वयंपाकघरात जातो,
हळूच फळीवर जाऊन बसतो,
ग्यासहि फळीवर असतो,
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो,
मो डोकावून बघतो
बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते..
या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही,
अर्थातच महाराज कधीच रिस्क घेत नाहीत..II६II

कवी- अज्ञात

No comments:

Post a Comment